ठाण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली भूमिका
ठाणे : ठाणेकरांचा विरोध असताना अमेझाॅन आणि रिंग मेट्रो प्रकल्प शहराच्या माथी मारला जात आहे. या प्रकल्पांविरोधात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
भिवंडी येथील एका कार्यक्रमाहून परतताना सुप्रिया सुळे यांनी ठाणे येथील पक्ष कार्यालयास भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
ॲमेझॉन डेटा सेंटर ठाणेकरांच्या माथी मारला जात आहे, त्याविरोधात ठाणेकर रस्त्यावर उतरलेले होते, याबाबत विचारले असता, या विषयावर ठाणेकर मलाही भेटायला आले होते. मी तातडीने स्थानिक खा. नरेश म्हस्के यांच्याशीही संपर्क साधला होता. आम्हाला हा डेटा सेंटर नको आहे. सगळ्यांचेच म्हणणे आहे, की हे डेटा सेंटर आम्हाला नको, ठाणेकरांचा जर त्याला विरोध असेल तर हे डेटा सेंटर तिथे येऊ नये, असा निर्णय डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतला आहे. रिंग मेट्रोची मागणीच नाही, तरीही हा प्रकल्प लादला जात आहे. आम्हाला मेट्रो नको त्याच्याऐवजी आम्हाला चांगली बस कनेक्टिव्हिटी द्या. ती बस कनेक्टिव्हिटी होऊ शकली तर पैसे वाचतील. जे काम ५०० रुपयांत होणार आहे, त्याच्यासाठी एक लाख रुपये कशाला खर्च करायचे? पण, या सरकारची खासीयत अशी आहे की, प्रकल्प जेवढा महाग, तेवढा या सरकारला प्रिय असतो. जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, असा टोला सुळे यांनी लगावला.
खड्ड्यांच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात खड्डयांची आता सवय झाली आहे. हजारो कोटींचा कोल्हापूरचा रस्ता, नको असताना लादला जातो. पण मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रस्ते यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. जीडीपी वाढीबाबत सत्ताधाऱ्यांकडून जल्लोष साजरा होत आहे. त्यांनी जल्लोष जरूर करावा. पण गरिबाच्या पोटावर पाय देऊन करू नये. जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी आर्थिक स्थिती खालावली असल्याचे म्हटले आहे आणि भारत सरकारचा डेटा काहीतरी वेगळं सांगतो. साखर, तांदूळ, गहू, अंडी सगळेच महाग झाले आहे. माणसाने जगायचं कसं? असा प्रश्न असताना जीडीपीबाबत जल्लोष कशाला असा खोचक प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला.